मी स्टॅच्यु केलं माझ्या लिबर्टीला
मी वाचला नाय वाचला पेपर
स्कीप केली न्यूज चॅनेल्स
ऐकली नवीन नवीन गाणी युट्यूब वर
मी स्क्रोलून प्यायले न्यूज फीड फेबूचं
OTT नि तासंतास पाहिले माझे डोळे
नि मोबाईल चार्ज होईपर्यंत
माझ्या पगाराने घेतली माझी काळजी
मग कोणाच्या हक्काच्या वार्ता चालल्यात?
कोणत्या देशात होते आहे लोकशाहीची हत्या?
कोणत्या जातीच्या बाईची होते शेतात भाजावळ?
मग विद्यापीठांच्या वावरांत ट्रॅक्टरने नांगरायचं तरी कशासाठी?
हे सगळं आपल्याला चघळत राहत असताना
थुंकलेही जात नसू यातून कधीच जरतरमग…
मग पांढऱ्यावर काळ करणाऱ्या पोष्टींना ‘सामायिक’ तरी का करायचं!
माझ्या ताटात पडेल अन्न
माझ्या अकाउंट वर मिळेल लोन
मला जातीचं कुठे काय
मी बायनरीतलं निवडून एक लिंग
घेतलं शिकून किपॅड बडवायला
बसलं गपगुमान घरात स्वतःची स्वतः करत क्रांती…
मग पडणारंच नाहीत दगड कोणाच्याच टाळक्यात!
असो
चालायचंच
बघवत नाही
सहन होत नाही
याला काही अर्थ नाही
काहीच होऊ शकत नाही
आपलं कोणाचं काही जात नाही
किती नि काय ऐका-वाचा-बोलायचं कळत नाही…
नि असलं काय नि काय
म्हणायला वाव देणारी
लिबर्टी
दाराच्या कडीसारखी
लावून टाकली की मिटतो प्रश्न आपल्यापुरता.
दारावर धडका बसू लागतात
अधूनमधून
उघडेल की काय
या भीतीपोटी
मी स्टॅच्यु केलं माझ्या लिबर्टीला
– प्राजक्ता
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)