सावजी मटन म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते नागपूर… झणझणीत काळा रस्सा…. त्यावर तेलाचा भरपूर तवंग… खातांना डोळ्यात पाणी येईल असा झणझणीतपणा… पण तरीही सर्वांना चटक लावणारी खाद्यशैली म्हणजे सावजी…
सावजी मटन खाद्यशैलीचं वैशिष्ट्य
या सावजी खाद्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रस्सा हा काळ्या रंगाचा असतो. त्यावर तेलाचा भरपूर तवंग असतो. सावजीचा झणझणीतपणा कोल्हापुरीपेक्षाही अधिक असतो. सावजी खाताना डोळ्यातून पाणी येतं. तोंडातून सुसु असा आवाज येतो. खाताना अनेकदा तेलामुळे ठसकाही बसतो. जर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि तोंडातून आवाज आला नाही तर ‘ कुच जमा नही’ असं रेटिंग दिलं जातं. इतका झणझणीतपणा असूनही दुस-या दिवशी तुम्हाला कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. हे सावजीचं वैशिष्ट्य आहे.
या सावजी खाद्यशैलीलाही एक छोटा इतिहास आहे. पूर्वी नागपुरात मोठ्या संख्येनं मिल्स होत्या. तेव्हा मध्यप्रदेशातून काही हलबा कोष्टी बांधव कामासाठी नागपूरमध्ये आले आणि इथच स्थायिक झाले. सुट्टीच्या दिवशी रात्री ते सर्व मिळून एकत्र जेवायचे. मग कोण काय आणि कशा पद्धतीनं बनवतात याची पैज लागायची. त्यातूनच ही शैली जन्माला आली असं म्हणतात. मात्र ही शैली तेव्हा केवळ तितकीच मर्यादित होती. ती नागपूरकरांना माहिती होण्यासाठी आणखी बराच वेळ होता.
सावजी खानावळ
पुढे मिल्स बंद झाल्या. आता पोटापाण्यासाठी काय करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातले बहुतांश लोक हे गोळीबार चौक परिसरात राहायचे. ज्यांचं घर रस्त्याला लागून होतं त्यांनी घरीच सावजी खानावळ काढण्याचं ठरवलं. आणि त्यातून गोळीबार चौकात पहिल्यांदा सावजी हॉटेल सुरू झालं. त्या हॉटेलचे नाव आहे युवराज सावजी. त्या हॉटेलमधल्या खाद्यशैलीनं नागपूरकरांना वेड लावलं. मागणी इतकी होती की इतरांनीही लगेच घरीच खानावळ ठाटल्या. त्यासोबत मंगळवारी टेलिफोन एक्सचेंज परिसरातही काही घरगुती सावजी खानावळी थाटल्या गेल्या. आणि हे कोष्टी बांधव तेव्हापासून सावजी म्हणून ओळखले जाऊ लागले. जगदिश सावजी, मोहन सावजी, पिंटू सावजी हे सावजी रातोरात प्रसिद्ध झाले.
सावजी खाद्यशैलीत वेगळं काय?
सावजी मटन म्हणजे काळ्या तरीचा तवंग आणि तिखट.
ही सावजीची एक महत्त्वाची ओळख.सावजी तयार करताना त्यात वापरले जाणारे मसाले अधिक भाजले जातात.
सोबतच त्यात वापरले जाणारे खोबरे संपूर्ण काऴे होत पर्यंत भाजले जाते.
त्यामुळे सावजी डिशवर एक काळ्या रंगाची तेलाची तवंग असते. शिवाय यात तेलाचा वापरही अधिक असतो.
रस्सा घट्ट होण्यासाठी यात सवताळ (काही धान्याचे पिठ) वापरले जाते. मात्र त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.
कुठे खावं सावजी?
नागपुरात तर्री पोहे कुठेही खा, तुम्हाला ते बेस्टच मिळणार पण सावजीबाबत मात्र तसं नाही.
विदर्भातला असूनही याआधी मी अनेकदा सावजीच्या नावाखाली फसलो गेलोय.
सावजीच्या नावावर अपेक्षाभंग करणारे अनेक डुप्लिकेट हॉटेल नागपुरात आहेत.
भरपूर तिखट, भरपूर खडा मसाला आणि काळा मसाला,
त्यावर भरपूर तर्री असं म्हणून डुप्लिकेट सावजी खाऊ घालणारे हॉटेलची नागपुरात कमी नाही.
त्यामुळे पारंपरिक सावजी खायचं असल्यास गोळीबार चौक, मंगळवारी या परिसरातच ट्राय करा.इतर ठिकाणी अपेक्षाभंग होण्याचे चांस अधिक आहेत. त्यातच पिंटू सावजी किंवा जगदिश सावजी यांच्या नावानं कुठं बोर्ड दिसला तर सावध राहा. कारण त्यांच्या नावाचा फायदा घेऊन अनेक डुप्लिकेट पिंटू सावजी आणि जगदिश सावजी नागपुरात आहेत. अनेकांनी त्यांच्या नावापुढे न्यू पिंटू सावजी किंवा न्यू जगदिश सावजी असं देखील केलंय.
‘घासफुस’वाल्यांना कुणी वाली आहे की नाही?
सावजी म्हटलं की केवळ मांसाहारी पदार्थ अशी समजूत आहे. मात्र हे पूर्णतः चुकीचं आहे. डाळकांदा, पाटवडी, खसखसची भाजी, पूर्ण वांग्याची भाजी हे सावजी पदार्थ सुध्दा खूप प्रसिध्द आहेत. याशिवाय ओल्या तुरीच्या दाण्याची, वालाच्या दाण्याची भाजीही खूप प्रसिद्ध आहे. पण ही डिश सिजनेबल आहे. नागपूरमध्ये तर्री पोहे फार प्रसिद्घ आहे. त्याचा रस्सा सावजी पद्धतीने बनवून सावजी पोहे पण अनेक ठिकाणी मिळेल. पण सावजी पोहे केवळ भ्रष्ट नक्कल म्हणता येईल.
आज नागपूरकरांसोबतच पर्यटकांच्या जिभेचे चोलले पुरवण्यासाठी अडीचशे ते तीनशे सावजी हॉटेल्स आहेत. नागपूरला येऊ जो सावजी न खाता परत जातो तो खवय्याच नाही. पुढच्या वेळेस जर नागपुरात आले तर गोळीबार चौक, टेलिफोन एक्सचेंज, मंगळवारी नक्की लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचे… डुप्लिकेट सावजी पासून थोडे सावध राहा आणि विदर्भाबाहेरील असाल तर थोडे कमी तिखट करायला सांगा.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1