राजेशाही असणारा कतार देश सन १९७१ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हा पासून येथे राजेशाही आहे. सद्या देशाचे राजे, देश प्रमुख शेख तमीन बिन अहमद अल थानी आहेत. त्यांच्या घराण्याचे राज्य सन १९७१ पासून येथे आहे.कतार मध्ये राजेशाही आहे म्हटल्यावर लोकशाही नाही हे ओघानेच आले.मात्र ते स्वतः उदारमतवादी असून स्पोर्ट्स चे चाहते आहेत.अनेक आशिया व जागतिक पातळीवरील स्पोर्ट्स कमिटीवर कार्यरत असल्यामुळे फिफा वर्ल्डकप २०२२ कतार मध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. विपुल प्रमाणात खनिजतेल, गॅस उपलब्ध असल्यामुळे हा देश गर्भश्रीमंत आहे याचा उल्लेख या पूर्वी केला आहेच.
कतार राजेशाही : राजाची स्वतंत्र सेक्युलर राज्यघटना
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या राजेशाही चा विचार करता राजाचा कायदा मोठा की धर्म कायदा मोठा हा वादविवाद चालत आला आहे.
पण धर्मा पेक्षा राजाचा कायदा मोठा असे नेहमी ठरविले गेले आहे. येथेही राजाची स्वतंत्र राज्यघटना आहे.
येथील जी राज्यघटना आहे त्यामध्ये शरिया मधील अनेक कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.सेक्युलर तत्वांचा ही त्यात समावेश आहे. कौटुंबिक बाबींसाठी शरियातील कायदे अस्तित्वात असल्यामुळे स्त्रियांचा सुरक्षिततेकडे जास्तच लक्ष दिले जाते. समोरासमोर घरे असतील व त्यांच्या गॅलऱ्या, खिडक्याही समोरासमोर असतील तर पुरुषांना गॅलरीत उभे राहण्यास ही मनाई आहे.अर्थात बाहेर मार्केट मध्ये, समुद्र किनारी ,फिरण्याच्या ठिकाणी सर्वत्र स्त्रीपुरुष एकत्र असण्यावर कोणतेही बंधने नाहीत.
आठवड्यातील दोन दिवस चौपाटीवर केवळ स्त्रियांसाठी राखून ठेवले आहेत.
धार्मिक स्तरावरील कतार ची लोकसंख्या
ह्या देशात मुळचे कतारच्या नागरिकांची संख्या कमी असून जगातील विविध देशातील नागरिक येथे येऊन स्थायिक झाले आहेत. त्यातही आशियातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्थान येथील नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरी निमित्त येथे आले आहेत. युरोप मधील बरेच लोक इथे येऊन स्थायिक झाले आहेत. कोणी नोकरीसाठी येथे राहत आहेत. युरोपीयन लोंकाची अतिशय पॉश वस्ती, एरिया येथे आहे. त्या एरियात फेर फटका मारला तर आपण युरोपमध्ये आहोत असेच वाटत राहते. अनेकांच्या स्वतःच्या मालकीच्या अतिशय महागड्या बोटी तिथे पाहायला मिळाल्या. समुद्रातून भ्रमंती करण्यासाठी त्या बोटींचा उपयोग केला जात असावा.

येथे मुस्लिम समाज बहुसंख्य असून त्यांचे प्रमाण ६५.२% आहे. त्या खालोखाल हिंदू समाज १५.९ % , ख्रिश्चन १३.७ % , बुद्धिस्ट ३.८% तर बाकी इतर समाज आहे. प्रत्येक समाजाला धार्मिक स्वातंत्र आहे पण मेळावे, सभा, आंदोलने ह्या सर्व बाबींवर कडक निर्बंध आहेत. सरकारच्या परवानगी शिवाय वरील कोणत्याही गोष्टी करता येत नाही.कडक निर्बंध असतांना देखील सद्याच्या परिस्थितीत इस्त्रायल युद्ध विरोधात निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली होती.
वाळवंटात ही फुलविले मळे, बगीचे
कतार मुळात वाळवंटी देश. आजुबाजूने समुद्र आणि मध्ये वाळवंटी भुभाग अशी कतारची रचना. पण कतार मधील शहरे पाहिले की हा वाळवंटी प्रदेश आहे यावर विश्वास बसत नाही. सर्व शहरभर हिरवीगार झाडे झुडपे , रोडच्या बाजूने सुंदर फुलांचे झाडे , बगीचे सर्वत्र पाहावयास मिळतात. इथे मुळात पावसाळा हा ऋतू नाही. कधीतरी एखाद्या दिवशी पाऊस पडतो. कतार देशाला जो पाणी पुरवठा होतो तो म्हणजे समुद्राचे पाणी शुद्ध करून केला जातो. कृत्रिम रित्या शुद्ध केलेले पाणी पूर्ण देशाला पुरविले जाते. आणि ह्याच पाण्यावर बगीचे झाडे फुलविले जातात. शेती केली जाते. एका शहरातून दुसऱ्या शहरात जातांना दोन शहरां मधील वाळवंटी भुभाग पाहावयास मिळतो पण रोडच्या आजूबाजूला मोठी झाडे व फुलझाडे लावलेली दिसतात. त्याची योग्य ती निगा राखाली जाते.
अलखोर शहरातील प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेलो तेव्हा त्याची प्रचिती आली.
येथे सूर्योदय सकाळी ५.३० च्या दरम्यान होतो तर सूर्यास्त संध्याकाळी ५.००- ५.१५ च्या दरम्यान होतो.
५.३० पासूनच काळोख होऊ लागतो. आम्ही ४.०० वाजेच्या दरम्यान झू गार्डन ला पोहचलो.

नाश्ता करण्यात व फ्रेश होण्यात अर्धा पाऊणतास गेला. त्यामुळे काळोखात लाईटच्या प्रकाशात झू गार्डन बघावा लागला.
झू प्रशस्त जागेत पसरले होते. पण प्राणी पक्षी यांचे तिथे कमी असणे नैराश्य पूर्ण होते.
जे ही थोडे प्राणी तिथे होते त्यांची निगा मात्र चांगली ठेवलेली होती.
वाघ, सिंह, कोल्हे, माकडे, अस्वल, जिराफ, झेब्रा, मांडा, हरण, काही छोटे छोटे प्राणी यांचे दर्शन झाले.
प्राणी झू च्या प्रशस्त स्वरूप पाहता कमी होते पण बगीचा मात्र चांगल्या प्रकारे मेंटेन करण्यात आला होता.
कल्पकतेने व कलात्मकतेने नटलेला देश
शहरातील कोणत्याही ठिकाणी जा त्या प्रत्येक ठिकाणी दिसते ती भव्यता , प्रशस्तता, कल्पकता आणि कलात्मकता.
कोणतीही वास्तू साधी सरळ बांधलेली दिसत नाही. लहान निवासस्थान असले तरी देखील ते आकर्षक दिसेल याची काळजी घेतलेली असते.
इमारती चकचकित काचेच्या वेगवेगळ्या आकाराच्या पाहून तर थक्क व्हायला होते.
बैलाच्या शिंगाचा आकार, डोळ्याचा आकार, गिफ्ट बॉक्स’चा आकार, त्रिकोण, काटकोन,
चेंडू, अंडाकृती, चपटी, शंकाकृती अशा कितीतरी विविध आकाराच्या भव्य इमारतींन’चे दर्शन होते.
कतार राजेशाही : भव्य अत्याधुनिक लायब्ररी

कतार विद्यापीठातील लायब्ररीला भेट दिली . अत्यंत भव्य, प्रशस्त, अत्याधुनिक सोईनेयुक्त लायब्ररी पाहून थक्क झालो. सर्वप्रकारच्या अभ्यासक्रमाची पुस्तके, ग्रंथ एकाच ठिकाणी असू शकतात ह्या लायब्ररीमुळे प्रथमता कळले. आर्ट, कॉमर्स, सायन्स पदवी पदवित्तोर अभ्यास क्रमांची पुस्तके आमच्या विद्यापीठांच्या लायब्ररी मध्ये असतात पण इंजिनियरिंग, मेडिकल सायसन्स, अग्रीकल्चर, फार्मसी , जगातील विविध लेखकांचे ग्रंथ, कथा, कविता, कादंबरी एकाच ठिकाणी पाहून डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. सर्व लायब्ररी डिजिटल ही होती.

अभ्यासासाठी विध्यार्थ्यांसाठी व संशोधकांसाठी डेस्कटॉप ( कॉम्पुटर ) विनामूल्य उपलब्ध होते. त्यावर नोट्स काढणे, डाउनलोड करणे अशा सर्व सुविधा उपलब्ध होत्या. लायब्ररी मेंबरशिप विनामूल्य होती. लायब्ररीचे मेंबर झाल्यावर सर्व पुस्तके मोबाईल, लॅपटॉप मध्ये डाउनलोड करतात येतात, म्हणजे घरी बसूनही सर्व पुस्तके, ग्रंथ उपलब्ध होतात. शिवाय इस्लाम आणि देशासंदर्भातील दुर्मिळ ग्रंथ, चित्रे यांचे अत्यंत चांगल्या प्रकारे जतन करण्यात आले आहे. अशी सुसज्य लायब्ररी नजीकच्या काळात आपल्या देशात निर्माण होणे केवळ अशक्य आहे.

आंतरराष्ट्रीय सुपर मार्केट
दोहा शहरातील सुपरमार्केट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुपरमार्केट आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील बऱ्याच देशातील प्रॉडक्ट्स, भाज्या, फळे इथे दिसतात. वेगवेगळ्या देशातील लोक इथे राहतात , त्यांना त्यांच्या देशातील धान्य, फ्रुट, भाज्या इथे मिळाव्यात म्हणून अशी व्यवस्था केली असावी.

शिवाय इतरांनाही दुसऱ्या देशातील फळे, भाज्या मिळाव्यात हा उद्देश असेल.
विशेष लक्षवेधी ते फिश आणि चिकन मटण शॉप्स.अत्यंत स्वच्छ आणि वास विरहित मच्छी मटण मार्केट ही संकल्पन्नाच माझ्यासाठी नवीन होती.
अत्यंत फ्रेश मासे, मटण व्यवस्थित पीस करून प्लास्टिक मध्ये सिलबंद करून ठेवलेले.
आख्खे मासे घेतले तरी व्यवस्थित तुकडे करून पॅक करून देणे. सर्वच नियोजनबद्ध. सर्वच बर्फात, फ्रीझ मध्ये ठेवलेले.

वेगवेगळे मॉल, मार्केट्स, शॉप प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ पाहायला मिळाले. एका भव्य मॉल मध्ये तर बोटींग ची व्यवस्था केलेली आणि इतक्या मोठ्या मॉल चे पूर्ण छत आकाशा समान बनवलेले. आपण मोकळ्या आकाशाखाली आहोत की मॉल मध्ये हेही पटकन लक्षात येत नाही.
चोवीस तास पाणी
वाळवंटी प्रदेश असून देखील सगळीकडे चोवीस तास पाणी उपलब्ध असते. बगीचे आणि झाडांना दररोज पाणी मिळेल याची अध्ययावत यंत्रणा उभी केली आहे. सांडपाण्याचे रिसायकल केले जाते. ते पाणी पुन्हा उपयोगात आणले जाते. भारताप्रमाणे समुद्रात सांडपाणी सोडले जात नाही. त्यामुळे समुद्राचे पाणी अत्यंत स्वच्छ नितळ , निळेशार आहे. मॉल, दुकाने, हॉटेल येथे असलेल्या डस्टबिन स्वच्छ व आकर्षक असतात. रस्त्यावर चुकूनही कुणी कचरा टाकतांना दिसत नाही. शहरांमध्ये कुठेही स्लम एरिया किंवा गरिबांची वस्ती दिसली नाही. स्थानिक लोकांचे घरे हे बंगल्यासमान आकर्षक होती तर बाहेरील देशातील नोकरी निमित्त नागरिक भाड्यांच्या फ्लॅट मध्ये राहतात. सर्व सुखसोई उपलब्ध असल्या तरी लोकशाहीत मुक्तपणे राहणाऱ्या लोकांना राजेशाहीत राहणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे वाटेल यात शंका नाही.

अशोक हंडोरे
नाट्यकर्मी,सामाजिक चळवळ विश्लेषक
भाग – 3 कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के
कतार : सफर एका समृद्ध देशाची,म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट भाग -2
कतार : सफर एका समृद्ध देशाची भाग – 1
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 25,2023 | 18:00 PM
WebTitle – Monarchy, Social System and Judicial System in Qatar