स्वातंत्र्यपूर्व काळातील निपाणी हे दक्षिण महाराष्ट्रातील म्हैसूर प्रांतस्थित महत्वाचे शहर होते. प्रांतरचनेनुसार आज हे शहर कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आपल्या सर्वांगीण प्रगतीने तालुक्याचा दर्जा प्राप्त केलेले शहर आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून विचार करता स्वातंत्र्यपूर्व काळात सत्यशोधक चळवळ आणि आंबेडकरी चळवळ निपाणी भागात फोफावत चाललेली दिसून येते. याचे कारण असे की, निपाणी शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नऊ भाषणे झाली होती. केवळ भाषणांसाठीच नव्हे तर इतरवेळीसुद्धा बाबासाहेबांचे वास्तव्य निपाणी परिसरात असायचे याच्या नोंदी आहेत.बेळगांव जिल्ह्यातील ‘गळतगा‘ हे प्रेरणास्थान म्हणून रूजविले पाहिजे.
बाबासाहेबांच्या भाषणांनी जाती झटकून टाकण्याची ऊर्जा प्राप्त झाली
डॉ. बाबासाहेब ‘आंबेडकरांचा सांगाती’ असलेले आयु. बळवंतराव वराळे यांच्या पुढाकाराने
निपाणी परिसरातील अनेक गावांमध्ये आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणि प्रसार होत होता.
या भागातील जातीव्यवस्थेचे चटके सोसत मेलेल्या जनावरांचे मांस नित्याने खाणाऱ्या अस्पृश्य समाजाला
बाबासाहेबांच्या भाषणांनी जाती झटकून टाकण्याची ऊर्जा प्राप्त झाली होती.
निपाणी परिसरातील सदलगा, बेनाडी, कोडणी, एकसंबा, बेडकिहाळ, कोगनोळी कणगले,
कोथळी, पट्टणकुडी, मांगुर, चिक्कोडी या भागातील मांग, महार, ढोर, चांभार आदी
अस्पृश्य लोकांचे थवेच्या थवे बाबासाहेबांच्या भाषणाला उपस्थित असायचे.
“हिंदूंच्या शास्त्रात अस्पृश्यता असून ती पाळणे हा धर्म असल्याचा धर्ममार्तंड यांचा दावा आहे.
याचा उघड अर्थ असा की आम्ही एक तर सगळी शास्त्रे जाळून राख केली पाहिजेत
अगर शास्त्रे चाळीत बसून अस्पृश्यतेसंबंधी जे निर्णय असतील ते खोटे ठरवीत बसले पाहिजे.
जिथे जिथे म्हणून माणूसपणाचे समान हक्क हिरावून घेण्यात आले होते तेथे तेथे मोठी रणे माजली”
ही भीमगर्जना निपाणी येथील 11 एप्रिल 1925 रोजीच्या भाषणात बाबासाहेबांनी केली होती.
इज्जत माणसाला अत्यंत प्रिय असून देवाला जोगत्या सोडल्यामुळे ती रसातळाला जात असते.
याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी “लोकांनी एकत्र येऊन चार पाच हजार रुपये एकत्र केले तर या प्रांतात मुलांच्यासाठी एखादे वसतीगृह उभा राहू शकते” असे सांगितले होते आणि ते भविष्यात धारवाड येथे मुलांच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी ऊभेही केले. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ याप्रमाणे बाबासाहेबांनी ते करून दाखवले. पुणे करारावेळी बाबासाहेबांच्या विरोधात जे रान पेटले होते त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना मानसिक आधार आणि नैतिक पाठबळ देण्याचे काम त्यांच्या निपाणी भागातील कल्याणमित्रांनी केलेले होते.
23 मे 1932 च्या निपाणीतील भाषणावेळी बाबासाहेबांच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. तो हल्ला निकराने छातीवर घेऊन आणि थोपवूनही लावणारे कल्याणमित्रही निपाणी भागातील होते. या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते “आपण आपली संघटना अभेद्य अशी ठेवली पाहिजे. इज्जत माणसाला अत्यंत प्रिय असून देवाला जोगत्या सोडल्यामुळे ती रसातळाला जात असते. निपाणी भागात यल्लमा देवीला जोगत्या सोडण्याची जी वाईट पद्धत आहे तिचा आपण त्याग केला पाहिजे. मृत मांस आणि रयताकडून आणलेले खाणे बंद केले पाहिजे”. या त्यांच्या भाषणाने लोकांमध्ये आपल्यासाठी स्वतंत्र देव आणि स्वतंत्र मंदिर उभारण्याची भावना निर्माण होणे ही बाब क्रांतिकारकच म्हणावी लागेल.
पुणे करारातून राजकीय हक्क मिळवून घेऊन आपण स्थापन केलेल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाच्यावतीने बाबासाहेबांनी बी. एच. वराळे यांना निवडणुकीसाठी उभे केले होते. वराळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी अक्कोळ, गळतगा, नेज, एकसंबा, नणदी, बेडकीहाळ, हिरेकुडी, चिक्कोडी इत्यादी भागात झाडून प्रचार केला होता. बाबासाहेबांच्या भाषणांनी थक्क होऊन अभूतपूर्व अशी क्रांती झाली आणि बी. एच. वराळे बेळगाव मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आले. याचा अर्थ असा की ही गावे बाबासाहेबांशी जवळीक असलेली गावे आहेत. या भूमीतून बाबासाहेबांवर जीव ओवाळून टाकणारे क्रांतिकारक तयार झाले.
माझ्या शरीराचे दोन तुकडे करून ते लिंबूप्रमाणे कापा
3 डिसेंबर 1938 च्या बाबासाहेबांच्या निपाणीतील भाषणावेळी बाबासाहेबांची मिरवणूक रथातून निघाली होती. हा रथ ओढण्यासाठी 101 बैलजोड्या रथाला जुपलेल्या होत्या, महत्त्वाचे म्हणजे हुन्नरगी या गावचा सुप्रसिद्ध बँड रथाच्या समोर सप्तसुरांची आतषबाजी करत होता. बाबासाहेबांच्या मिरवणुकीसमोर त्यांच्यावर अफाट प्रेम करणारा बेडकिहाळचा बाळ नाईक मनातून अतिशय बेहोश होऊन धुंदपणे बागडत आपल्या सहकाऱ्यांना म्हणत होता की “माझ्या शरीराचे दोन तुकडे करून ते लिंबूप्रमाणे कापा आणि ते तुकडे बाबासाहेबांवरून ओवाळून टाका म्हणजे माझ्या जन्माचे सार्थक होईल” अशी निष्ठा जोपासणारे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीने निर्माण केले होते.
याच भागात वास्तव्य करून माता रमाईने धारवाड येथील वसतिगृहातील मुलांच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या सोयीसाठी आपल्या हातातील सोन्याच्या पाटल्या विकल्या होत्या. “आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे” ही घोषणा बाबासाहेबांनी याच भूमीतून दिलेली आहे.
तथागत बुद्धांच्या धम्माचे प्रशिक्षण केंद्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती नाकारणाऱ्या विचारांची आणि जाती निर्मूलनाच्या साधनांची ओळख करून देणारे Annihilations of Caste अर्थात जातिव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथाच्या प्रती मराठीत प्रकाशन करून 1938 मध्ये सीमाभागात त्याचे वितरण करण्याचे काम बेनाडीचे राजाराम गायकवाड यांनी केलेली आहे. बी. एच. वराळे हे तर निवडून आलेच पण निपाणी नगरपरिषदेवरही बाबासाहेबांच्या चळवळीने अनेक वर्षे यशोपताका फडकवत ठेवली होती किंबहुना आजच्या नगरपरिषदेच्या प्रगतीचे बीज या चळवळीनेच रुजवले आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. शेडबाळ, सोळी, अथणी आणि ऐगळी या गावांमध्येही बाबासाहेबांनी सभा घेतलेल्या होत्या.
25 डिसेंबर 1952 रोजी निपाणी मध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेचे पडसाद प्रांतभर पसरून जे परिवर्तन झाले
त्या परिवर्तनाचा वारसा आजतागायत या भागातील चराचरात दिसून येतो.
गेल्या काही वर्षांपासून निपाणी जवळील गळतगा या गावामध्ये तक्षशिला या प्रशस्त बुद्ध विहारामध्ये
भंते बुद्धपुत्र गुरुधम्मो यांच्या मार्गदर्शनामध्ये तथागत बुद्धांच्या धम्माचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे.
याचा अर्थ इतर कोणत्याच गावांत संस्कार केंद्रे, धम्म अभियान, विहार कार्यक्रम झाले नाहीत असे नाही.
श्रामणेर दीक्षा शिबीर आणि धम्मपरिषदांचे आयोजन
यावर्षीच्या 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर, सम्राट अशोक विजयादशमीपर्यंत लोकजागृती करून अनेक संघटना, कार्यकर्ते आणि श्रद्धावान व्यक्ती यांच्या मदतीने भंतेजीनी लोकजागृती करत अक्कोळ, अप्पाचीवाडी, माणकापूर, बेडकिहाळ, बारवाड, भोज, नेज, शिप्पूर, नांगनूर, खडकलाट आणि गळतगा येथे श्रामणेर दीक्षा शिबीर आणि धम्मपरिषदांचे आयोजन केले. या आयोजनामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, ब्राईट आर्मी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, युवा बौद्ध धम्म परिषद आणि स्थानिक स्तरावरील तरुण मंडळे ही समविचारी मंडळी धम्म जागृतीसाठी एकत्र आली, भविष्यालातही येतील.
गळतगावासीयांनी तर समाजातील जवळजवळ चाळीस मुलामुलींचा संच श्रामणेर दिक्षा देऊन भंते गुरूधम्मो यांच्यासोबत दहा दिवस गावोगावी प्रचारासाठी पाठवला हे त्यांचे ऐतिहासिक योगदान आहे. सम्राट अशोक विजयादशमी रोजी तक्षशिला बुद्ध विहार गळतगा याठिकाणी बेळगाव जिल्ह्यातील पहिली विशाल बौद्ध महापरिषद आयोजित झाली. निपाणी तर प्रेरणास्थान आहेच शिवाय गळतगा सुद्धा स्पर्शभूमी आणि धम्मभूमी आहे. भंते बुद्धपुत्र गुरुधम्मोजी या परिसरात असेपर्यंत गळतगा आणि इतर गावांमध्येही धम्म प्रभाव वाढवूया. बेळगांव जिल्ह्यातील बुद्ध विहारे एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी भंतेजींचे हात आणि पाय मजबूत करूया.
‘गळतगा‘ हे प्रेरणास्थान म्हणून रूजविले पाहिजे
या विहाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपापल्या गावांतील विहारे सक्रिय व्हायला हवी. सामाजिक कार्यकर्ते, समविचारी पक्ष-संघटनांमधील श्रद्धावान आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनी पुढे होऊन तन-मन-धनाने गळतगा आणि परिसरातील गावांमध्येही धम्म चळवळ वृद्धिंगत करायला हवी. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगांवसोबत बेळगांव जिल्ह्यातील ‘गळतगा‘ हे पण आमचे प्रेरणास्थान म्हणून रूजविले पाहिजे.दर रविवारी गावोगावची विहारे धम्मज्ञान घेण्यासाठी सक्रिय करून आपल्या इतिहासाबरोबरच भूगोलाचेही संवर्धन करायला हवे.
(या लेखातील ऐतिहासिक बाबींचे कागदोपत्री पुरावे आहेत.
अधिक माहितीसाठी प्रा. नामदेव मधाळे लिखित ‘निपाणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे’ हा ग्रंथ वाचावा)
हेही वाचा… माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द
हेही वाचा… भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
महाडचा रणसंग्राम प्रेरणादायी इतिहास
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)