कोणतीच लस १००% संरक्षण देत नाही.
एमपीएससीच्या परिक्षार्थ्यांनो
स. न. वि. वि.
दोन दिवसांपूर्वी शासनाच्या एका अगम्य निर्णयामुळे तुमची गैरसोय होणार हे लक्षात आलं.
तुम्ही चिडून उठलात. तुमच्याविषयी आस्था असणारी आमच्यासारखी सामान्य माणसे,
नेटिझन्स देखील चिडून उठले आणि तुमच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही तुम्हाला मनापासून पाठिंबा दिला.
तो अप्रिय निर्णय मागे घेतला गेला नाही, पण तुमचा असंतोष कमी होईल असा दुसरा निर्णय घेतला गेला.
तुम्हाला आता येऊ घातलेल्या परिक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमच्यातील काही जण या परिक्षेत आणि पुढच्या प्रक्रियेत यशस्वी होऊन सनदी अधिकारी होतील.
तुम्ही विविध सरकारी खात्यांमध्ये कलेक्टर, आयुक्त, रजिस्ट्रार वगैरे पदे भूषवाल. आम्हाला त्यात आनंदच आहे.
आणि तुमच्याकडून एक अगदी छोटी आशा देखील आहे.
इथून पुढच्या काळात आमच्या किंवा पुढच्या पिढीतली सामान्य माणसे शिधापत्रिका, आधार कार्ड, डोमिसाईल, जात पडताळणी, घरपट्टी, वीजजोडणी, पासपोर्ट, एफआयआर, विवाहनोंदणी, वारसदारांच्या नावांची नोंद, घरांची खरेदीविक्री…
लहानमोठ्या कोणत्याही कामांसाठी तुमच्या केबिनच्या दारात येतील तेव्हा त्यांना तुम्ही सौजन्याने, सन्मानाने वागवाल. कायद्याच्या चौकटीत बसणारे कोणतेही काम विनाकारण अडणार नाही. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ – ही म्हण तुमच्या अमदानीत कालबाह्य ठरेल. लवकरच अँटीकरप्शन खाते कायमचे बंदच करावे लागेल.
फार नाहीत ना आमच्या अपेक्षा?
शुभेच्छांसह
सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने
तुमचा एक शुभेच्छुक
विजय तरवडे
बीई,बीटेक प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण होणे आणि प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते.
नव्या शैक्षणिक धोरणात बीई, बीटेकला प्रवेश घेण्यासाठी बारावीला गणित, भौतिकशास्त्र अनिवार्य नाही अशी बातमी आहे,
मात्र अश्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळाल्यास त्यामध्ये गणित ,भौतिकशास्त्र असणार आहे,
त्यासाठी त्यांना जास्तीचा अभ्यास करावा लागणार आहे.
बीई ,बीटेक होताना गणित आणि भौतिकशास्त्र यांना पूर्णपणे वगळले जाणार नाहीये.
लोक अर्धवट माहितीच्या आधारावर मिम्स बनवताहेत एवढंच.
या निर्णयामागे नेमकं कारण काय आहे ?
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षी रिकाम्या जागांचे प्रमाण वाढतच आहे, मोजकी प्रतिष्ठित कॉलेज सोडली तर बहुतांशी कॉलेजात जागा रिकाम्या राहताहेत.
देशभरात असलेल्या या कॉलेजचे मालक वजनदार राजकीय लागेबांधे असलेले लोक आहेत,
कॉलेजेस जगवायला हा निर्णय घेतलेला आहे.
वेगवेगळ्या विद्याशाखा मधून इंजिनिअरिंग कडे विद्यार्थी आले तर प्रवेशाची संख्या वाढून कॉलेजला फीचे पैसे मिळतील,
कॉलेज तगून राहतील आणि दुकानदारी चालत राहील.
कॉलेज जगवणे महत्वाचे, दर्जेदार शिक्षण नाही हा साधा हिशोब आहे.
बेरोजगारी वाढत असताना हा निर्णय या बेरोजगारांच्या झुंडी अजून वाढवणार आहे हे नक्की.
शिक्षणाचा ,कॉलेजचा दर्जा सुधारायला काय उपाययोजना आहेत यावर कुणीही बोलत नाहीये, या शिक्षणातून स्वयंरोजगार, नाविन्यपूर्ण व्यवसाय याबद्दल सगळा ठणठणाट आहे.
हजार वेळा मांडलेली बाब किती वेळा सांगायची हाही प्रश्न आहे, तळाला असलेल्या वर्गाची क्रयशक्ती हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि कणा केव्हाच मोडून पडलेला आहे.
या वरवरच्या उपचारांनी रुग्ण बरा होणार नाही हे नक्की, फक्त डॉक्टरला फी मिळून त्याच पोट भरेल एवढंच.
लेखन – आनंद शीतोळे
गोष्ट तशी फार जुनी नाहीय.
खरे यांची ‘उद्या’ ही कादंबरी अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमात लागली होती, आणि त्याच वर्षी नंदा खरे यांचा एक प्रोग्राम विद्यापीठ मध्ये घ्यायचा ठरलेला. त्याबाबत बोलायला आम्ही मराठी विभागातील एका मॅडम कडे गेलेलो (नाव घेता येणार नाही, मॅडम नाराज होतील) तर मॅडम फार भरभरून नंदा खरे यांच्या बद्दल बोलत होत्या, त्यांचं सर्व प्रकाशित साहित्य मी वाचलंय आणि माझ्या संग्रही आहे, त्यांना तीन ते चार वेळा भेटली आहे असं पण त्या बोलल्यात.
आणि आम्ही आता पण संपर्कात आहो, नेहमी बोलणं होत राहतं, चांगल्या मैत्रिणी आहो वगैरे वगैरे. जातांना मी मॅडम ला फक्त एवढंच म्हणालो की, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय, नंदा खरे हे पुरुष लेखक आहेत, आणि हा घोळ नको व्हायला म्हणून कदाचित प्रकाशक त्यांच्या पुस्तकांमागे ब्लर्ब सोबत त्यांचा फोटो पण छापतात.
लेखन – निखिल वाघमारे
नंदा खरे हा पुरस्कार परत करतील ही खातरी होतीच , ते पुरस्कारवापसी चळवळ किंवा इतरवेळी प्रकाशात आले नसले तरी हे त्यांच्या लिखाणावरुन जाणवत होतं बऱ्याचवेळा फक्त कागदावर भूमिका घेतल्या जातात पण नंदांच्या राहुल बनसोडेेंनी घेतलेल्या मुलाखतीतून त्यांनी व्ववस्थेवर जे आसूड ओढलेत , व्यवस्था आणि सेंट्रलाइज्ड झालेली सत्ता , जागतिकीकरण , यावर जी मतं मांडलीत त्यावरुन हा लेखक माणूस म्हणूनही या सगळ्याला गंभीर क्रियाशील प्रतिसाद देणारा आहे हे जाणवत होतं . ही मुलाखत आणि त्यांची ‘ उद्या ‘ वाचल्यावर हा लेखक अजून ‘ अर्बन नक्षलाइट ‘ म्हणून करार कसा दिला गेला नाही याचं आश्चर्य वाटलं . नंतर विचार केला तर असा जाणवलं की हा लेखक साहित्याच्या बाजारात खपावू नाहीय एवढंच नव्हे तर याचं दुकान फार जोरात चालत नाहीय शिवाय यांची पुस्तकं वाचकाला घोडा समजून पाण्यापर्यंत वाट दाखवत नाहीत तर पाणी शोधण्याचं आवाहन करतात , पाणी शोधण्याच्या क्लूप्त्या सांगतात . असा विचार करायला सांगणारा लेखक भारतात ‘ चालत ‘ नाही तो प्रसिद्ध होत नाही त्यामूळे तो सत्ता संबंधाना त्रासदायक ठरत नाही ! व्यक्तीश: मला उद्यापेक्षा त्यांचं ‘ कापूसकोंड्याची गोष्ट ‘ जास्त आवडलं . मॅचेस्टरचे कारखाने चालावेत म्हणून विदर्भातल्या शेतीची वाट लावत कापसाचं पीक कसं लावलं , त्यासाठी मालगुजारीला जन्म कसा दिला , वरवर तोट्यात चाललीय वाटणारी अशी मुर्तीजापूर – अचलपूर शकुंतला रेल्वे सुरु कशी राहीली त्याचे परिणाम काय झाले याचा धांडोळा ‘ कापूसकोंड्याची गोष्ट ‘ मधे घेतला आहे .
याच बरोबर 536 पानांच A5 आकाराचं ‘ कहाणी मानवप्राण्याची ‘ हे पुस्तक मी आजवर वाचलेलं माणसाचा इतिहास सांगणारं सगळ्यात भारी पुस्तक आहे . तसंच ‘ डार्विन आणि जीवसृष्टीचं रहस्य ‘ हे पुस्तक अगदी अफाट असच आहे .
1)दगडावर दगड . विटेवर विट
2) संप्रति
3) उद्या
4) वाचताना पहाताना जगताना
5) कहाणी मानव प्राण्याची
6) दगड धोंडे
7) वारुळ पुराण
8) ज्ञाताच्या कुंपणावरुन
9) डार्विन आणि जीवसॄष्टीचे रहस्य
10) अंताजीची बखळ
11) बखळ अंतकाळाची
12) नांगरल्याविण भुई
13) कापुसकोंड्याची गोष्ट
14) अॉन द तिच
15) इंडीका
16) ऐवजी
17) 2050
लेखन- श्रीधर चैतन्य
अरे माझ्या मित्रा , दुर्दैवाने सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा ऍमेझॉन च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून मागवता येत नाहीत रे
कोरोनाची लागण झालेल्या माझ्या मित्राला त्याच्या सख्या डॉक्टर भावाने बघायला देखील नकार दिला.
नाईलाजाने त्याला सरकारी इस्पितळात भरती व्हावे लागले; मित्र तक्रार करतोय सरकारी रुग्णालयातील सोयी यथातथाच आहेत
म्हणून मित्राच्या कारला हायवेर अपघात झाल्यानंतर, १० लाखांची लिमिट असणारे क्रेडिट कार्ड असून देखील
जवळच्या खाजगी रुग्णालयाने त्याला हात लावायला नकार दिला नाईलाजाने मित्राला सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे लागले;
मित्र तक्रार करतोय कि सरकारी रुग्णालयातील सोयी हव्यातश्या नाहीत म्हणून अरुणाचल प्रदेशात
जंगलात ट्रेकिंगला गेलेला मित्र आपल्या ग्रुपपासून अनेक तास दुरावला तेथे एकमेव नेटवर्क होते बीएसएनएलचे.
अनेक तास जीव कासावीस, ग्रुपचा, घरच्यांचा आणि मित्र बीएसएनएलच्या सेवांच्या गुणवत्तेला दोष देतोय
अरे मित्रा तुझे वरचे तीन अनुभवच नाहीत तर अनेक जागा, वेळा, सिच्युएशन्समध्ये तू लाखो रुपये फेकायला तयार असलास तरी,
खाजगी क्षेत्र तुला स्पर्श देखील करणार नाहीये ती वेळ अशी असेल कि सेवा घ्यायची कि नाही हा ऑप्शन तुला नसेल;
झक्कत जीवनदान देणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा घ्याव्याच लागतील
तुम्ही सार्वजनिक उपक्रमाच्या सगळ्या रक्तवाहिन्या कापून टाकायच्या
आणि तुम्हाला हवे त्यावेळी, त्या स्थळी, हवे त्या सिच्युएशनला त्या सार्वजनिक उपक्रमाची सेवा मात्र वर्ल्ड क्लास पाहिजे ?
ती अर्थशास्त्रावरची पुस्तके नंतर वाचलीस तरी चालेल; फक्त बौद्धिक प्रामाणिकपणा ठेवलास तर
हे तुझ्या लक्षात येईल कि सार्वजनिक उपक्रम तुमच्यासाठी, तुम्हाला पाहिजे तेव्हा “सिलेक्टेव्हली” रसरसलेले असू शकत नाहीत
ते नेहमीच रसरसलेले असणे हे फक्त (तुमच्या भाषेत फुकट्या ) गरिबांसाठी नाही तर
तुमच्या श्रीमंतांच्या जीवन मरणासाठी देखील गरजेचे आहे
लेखन – संजीव चांदोरकर (१३ मार्च )
महत्वाचे
कोव्हिड-लस जरूर घ्या ! कोव्हिड-लस घेण्याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. अनेक तज्ञांनी दिलेला सल्ला अशांनी मानावा. हा सल्ला म्हणजे ६० वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांनी आणि ब्लड-प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, दमा, एच.आय.व्ही.-लागण इ. पैकी आजार असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील सर्वांनी ही लस जरूर घ्यायला हवी. आजार असल्याचे सर्टिफिकेट संबंधित डॉक्टर कडून घ्यावे. लस घेण्याच्या विरोधात जे मुद्दे पुढे केले जातात त्यांचा थोडक्यात विचार करू
१) “आमच्या भागात करोना गेला आहे; अनेक जण मास्क न घालता बिनधास्त वावरतात, त्यांना काहीही झालेले नाही. मला गेल्या वर्षभरात करोना झालेला नाही, त्यामुळे आता मला होणार नाही.” खरी परिस्थिती अशी आहे की “आता करोना गेला” असे म्हणता म्हणता अनेक ठिकाणी कोव्हिड-१९ च्या केसेस वाढल्या आहेत. पुण्यात सप्टेंबर मध्ये दिवसांत ४००० केसेस होत्या. जानेवारी-अखेर त्या ५०० पर्यन्त कमी झाल्या. पण फेब्रुवारी मध्ये वाढत जाऊन आता दिवसाला १३०० केसेस होऊ लागल्या आहेत! ज्या वस्त्यांमध्ये केसेस व्हायच्या बंद झाल्या होत्या तिथेही त्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांना आतापर्यंत कोव्हिड-१९ झाला नाही त्यांना यापुढे होऊ शकतो !
कोणतीच लस १००% संरक्षण देत नाही
२) “ही लस बोगस आहे, तिचा काही उपयोग नाही, ही लस घेतलेल्यानाही करोना झाला आहे. लस करणा-या कंपन्यांचा फक्त फायदा! “ खरी परिस्थिती अशी आहे की दोन डोस झाल्यावर दहा दिवसांनी पूर्ण प्रतिकार शक्ती येते. ही जी उदाहरणे दिली जातात त्यात दोन डोस घेतलेले फारसे कोणी नाही ! दुसरे म्हणजे कोणतीच लस १००% संरक्षण देत नाही. मात्र या लसीच्या अभ्यासात दिसले आहे की लसीचे दोन डोस पूर्ण केल्यावर अगदी क्वचित कोणाला कोव्हिड-१९ चा आजार झाला तरी तो सौम्य असतो. सहसा तीव्र आजार होत नाही आणि कोणीही कोव्हिड-१९ ने दगावत नाही. रेनकोट किंवा छत्री ने आपले पावसापासून पूर्ण संरक्षण होत नाही. पण ओलेचिंब होण्यापासून आपण वाचतो. तसेच हे आहे.
३) “ही लस पूर्ण परिणामकारक, निर्धोक आहे का? अनेक तज्ञांनीही सरकारवर या लसी बाबत टीका केली ती उगाच का? ” या लसीना भारतात ३ जानेवारीला परवानगी देतांना सरकारने काही चुका केल्या; पूर्ण सत्य पारदर्शीपणे लोकांच्यापुढे मांडले नाही. त्यामुळे अनेक तज्ञ, आणि माझ्यासारखे आरोग्य-कार्यकर्ते यांनी त्या बाबत टीका केली होती. दुसरे म्हणजे ही लस नवीन असल्याने लस दिल्यावर किती प्रमाणात, कोणते दुष्परिणाम होतात, सरकार त्याबाबत काय दक्षता घेत आहे, याबाबतीतही सरकार नीट माहिती देत नाहीय.हे सर्व असले तरी एक म्हणजे कोव्हिड-१९ आजाराचा धोका अजून फार मोठा आहे.
कोव्हॅक्सिन ८० टक्के परिणामकारक
साथ ओसरायला २०२२ उजाडावे लागेल व तोपर्यंत लस न घेणा-यांपैकी हजारो लोक कोव्हिड-१९ ने दगावतील. दुसरे म्हणजे जगात ठिकठिकाणी या कोव्हिड-१९ लसी बाबत खूप अभ्यास झाला आहे, निरनिराळ्या देशात कोट्यावधी लोकांनी लस घेतली आहे, भारतातही एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी ही लस घेतली आहे.
कोव्हॅक्सिन या भारतीय लसीबद्दल सुद्धा ती ८० टक्के परिणामकारक आहे असे संशोधनातून मार्चच्या सुरुवातीला हाती आलेल्या प्राथमिक विश्लेषणात दिसते. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर स्पष्ट आहे की कोव्हिड-१९ लस घेतल्याने हजारो जीव वाचतील आणि लाखो लोकांचा गंभीर आजार टळेल. प्रत्येकाने फक्त आपापला विचार केला तरी एकंदरित लस न घेण्यापेक्षा लस घेण्यामुळे आपली सुरक्षितता शेकडोपट वाढते. कोणत्याही औषधाचे काही ना काही दुष्परिणाम होतात; काही औषधांनी अगदी क्वचित जीव धोक्यातही येऊ शकतो. तरी सुद्धा जेव्हा गरज असेल तेव्हा आपण औषध घेतोच ! दुष्परिणाम होतील म्हणून औषध घ्यायला नकार देत नाही. तसेच या लसीबाबतही आहे.
४) “मला समजा ब्लड-प्रेशर, मधुमेह, हृदयविकार असेल किंवा दमा किंवा असा काही आजार असेल तर लस घेणे धोक्याचे आहे का? ” नाही. आतापर्यंतच्या संशोधनात असे आढळलेले आहे की अशा लोकांना या लसीचा काही जादा धोकासंभवत नाही. उलट असे आजार असलेल्यांना लोकांना कोव्हिड-१९ चा जास्त धोका आहे हे मात्र निश्चित सिद्ध झाले आहे..
५) लशीमुळे मी आजारी पडलो तर ? लाखामागे एकाला लसीची तीव्र रिअॅक्शन येऊ शकते. असे झालेच तर लगेच उपचार करता यावे म्हणून ही लस देतांना डॉक्टर हजर असतात व तीव्र रिअॅक्शन आलीच तर लगेच इंजेक्शन इ. ने उपचार करण्याची तयारी केलेली असते. लहान मुलांना त्यांच्या डॉक्टरच्या दवाखान्यातच त्यांच्या लसी दिल्या जातात. पण या कोव्हिड-लसीबाबत तुलनेने थोडाच अनुभव असल्याने ही लस साध्या दवाखान्यात नाही तर सरकारमान्य, सुसज्ज हॉस्पिटल मध्ये दिली जाते.
कोणताही गंभीर धोका नाही
६) ”लस घेतल्यावर काही लोकांना काही बाही त्रास होतो असे ऐकले आहे. असे झाले तर काय करायचे?” एकंदरित लहान मुलांना लसी दिल्यावर ज्या प्रकारे काहीना थोडा त्रास होतो तसाच प्रकार कोव्हिड-लसी बाबत आहे. कोविड-१९ ची लस घेतल्यावर अनेकांना इंजेक्शनची जागा थोडी दुखणं थोडी अंगदुखी डोकेदुखी, बारीक ताप अशा प्रकारे त्रास होऊ शकतो. गरज वाटली तर पॅरासिटॅमॉल ( क्रोसिन इ.) ची एक-दीड गोळी गरजे प्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा घ्यायला हरकत नाही.
थकवा वाटल्यास विश्रांती घ्या. काही जणांना दुसऱ्याविषयी अचानक थंडी वाजून ताप येऊ शकतो. असे झाले तर अजिबात घाबरू नका. ताप येऊ लागला की लगेच दीड परासिटॅमॉलची (क्रॉसिन इ.) गोळी घ्या, विश्रांती घ्या, बाकी काही करायची गरज नाही. मळमळ-उलटी, पोटदुखी, अंगावर पुरळ असेही होऊ शकते. पण घाबरु नका, त्याने कोणताही गंभीर धोका नाही. गरज वाटल्यास सरकारी डॉक्टरशी संपर्क करा. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी लस घेण्याच्या आधी आणि लस घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी आपला रक्तदाब तपासून घ्यावा कारण लस घेतल्यावर अगदी क्वचित प्रसंगी रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो.
६ फुट दूरी
७) लस घेतल्यावर कोव्हिड-१९ आजार न होण्याची गॅरंटी नाही, मास्क लावणे बंद करायचे नाही मग कशासाठी लस घ्यायची? कोव्हिड-१९ आजार न होण्याची गॅरंटी नसली यशस्वी लसीकरण झाल्यावर कोव्हिड-१९ ने मरणार नाही याची गॅरंटी आहे; तसेच तीव्र आजार होण्याची शक्यताही खूपच कमी आहे. मात्र घराबाहेर जातांना मास्क घालणे चालू ठेवावे लागेल कारण कोव्हिड चे विषाणू आपल्या श्वासमार्गात शिरून, त्यांची पिलावळ शरीरात वाढून ती आपल्या श्वासातून बाहेर पडण्याची थोडी शक्यता राहते; आजार होत नाही एव्हढेच. त्यामुळे आपण मास्क घातला नाही तर आपण इतरांना लागण देऊ शकतो. म्हणून आपल्या मार्फत इतरांना लागण होऊ नये म्हणून मास्क घालणे, ६ फुट दूरी ही पथ्ये साथ संपेपर्यंत चालू ठेवावी लागतील.
८) ज्यांना करोना होऊन गेला आहे, अशांनीही लस घ्यायला हवी? हो. कोव्हिड-१९ आजारांमुळे मिळालेली प्रतिकार-शक्ती त्याने वाढते. लसीचा दुसरा डोस घ्यावा लागत नाही. कोव्हिड-१९ झाल्यापासून एक महिन्याने ही लस घ्यावी. लेखन – डॉ.अनंत फडके
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 13 , 2021 12:05 PM
WebTitle – Social media corner latest & viral post in social media